विद्यार्थी आणि क्रिकेट मराठी निबंध |Vidyarthi Aani Cricket marathi essay,

 विद्यार्थी आणि क्रिकेट मराठी निबंध |Vidyarthi Aani Cricket marathi essay,

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  विद्यार्थी आणि क्रिकेट  मराठी निबंध बघणार आहोत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात नव्हे तर निमशहरात किंवा खेडेगावातसुद्धा विद्यार्थ्याचा आवडता खेळ कोणता असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर एकच येईल-क्रिकेट. शहरात तर  अशी एकही शाळा नसेल जिथे क्रिकेट विभाग नाही. मुले बाकी वाचत नसतील पण गावस्करचे" 'सनी डेज' सर्वाना माहीत असणार ! 


मुलांना शाळेतली गणिते येत असतील-नसतील, हिंदी, मराठी कविता बहुधा पाठ नसतीलच ! पण कोणी कोणत्या मैदानावर किती धावा काढल्या, कोणते. रेकॉर्ड मोडले, नवे उच्चांक कोणी कोणते स्थापन केले, मुलांना सारे तोंडपाठ आहे.


पुडेन्शिअल कप म्हणजे काय, विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारताने कसा विजय मिळविला. (त्याच भारताने भारतातच त्यानंतर वेस्ट इंडिज संघाबरोबर कसा सणकून मार खाल्ला !) ही माहिती मुलांना विचारा. या परीक्षेत १०० पैकी ८० पेक्षा जास्त गुण नक्की मिळणारच.


क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळ आहे हे मला मान्य आहे. जगाच्या पाठीवर असलेल्या इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड या सारख्या अनेक देशांतून या खेळाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. (आणि आश्चर्य असे की अमेरिका व रशिया या दोन परस्परविरोधी भूमिका असणाऱ्या देशांचे 'क्रिकेट नको' या बाबतीत एकमत झालेले आहे.) 


डॉन ब्रैडमन, सोबर्स, सी. के. नायडू, रिची बेनॉ, लॉइड, गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी या खेळात अनेक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. अनेकांची उद्बोधक चरित्रे, असंख्य कसोटी सामन्यांची आकाशवाणी व दूरदर्शनवरची प्रत्यक्ष धावती समालोचने, वृत्तपत्रांतून येणारी परीक्षणे, त्यासंबंधीची माहिती व अनेकांचे विक्रम नोंदवणारे शेकडो ग्रंथ, यामुळे या खेळाबद्दल मुलांना विशेष ओढ वाटणे साहजिकच आहे. 


शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटची आवड निर्माण व्हावी, त्या खेळात त्यांची प्रगती व्हावी यासाठी क्रिकेटचे सामान पुरविणे, त्यांना खेळायला शिकविणे, आंतरवर्गीय सामने घेणे, यातूनच तडफदारपणा, प्रामाणिकपणा, जिद्द या गुणांची जोपासना होते. 


सोबर्स किंवा गावस्कर काही एकदम आकाशातून अवतरले नाहीत. ते अशा शाळांतूनच तयार होत असतात. म्हणनूच मुलांना अशा खेळांसाठी प्रोत्साहन देणे केव्हाही योग्य व आवश्यकच ठरते. पण इथेच सारा घोटाळा होतो. क्रीडागुणांना उत्तेजन म्हणून ज्यांना डोक्यावर घ्यावे ते आपल्या डोक्यावर बसतात. 


कौतुकाने एखाद्या क्रिकेटपटू मुलाच्या पाठीवर थाप मारावी, तर तो उलट शिक्षकांना थापा मारू लागतो. क्रिकेट, क्रिकेट करता करता शिक्षणाचा व अभ्यासाचा खेळखंडोबा होतो. क्रिकेटच्या नावावर मोकाट फिरणारी मुलेच जास्त. 


तासन्तास् दिवसेन् दिवस अन महिनोन् महिने क्रिकेटच्या कोणत्या ना कोणत्या सामन्यांची धावती समालोचने, दूरदर्शनवरील प्रक्षेपणे यात विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे केवळ काही तास अन् काही दिवसच नव्हे तर क्वचित काही वर्षे फुकट जातात.


कोणत्याही गोष्टीचे कौतुक किती, कोठे व केव्हा करायचे यालाही मर्यादा हवी. सद्गुणांचा अतिरेक झाला की तेच सद्गुण दुर्गुण ठरतात. उदार माणूस उधळा ठरतो. काटकसरी माणूस कंजुष, चिकू बनतो. म्हणून क्रिकेटची आवड ठीक, पण क्रिकेटचे वेड नको. अतिरेक नको. कारण

अतिदानादलिर्बद्धः अतिमानात्सुयोधनः ।

 रावणो अतिमदान्नष्टः अति सर्वत्र वर्जयेत् ।।


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद