मराठी पाऊल पडते पुढे मराठी निबंध | Marathi Paul Padte Pudhe Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मराठी पाऊल पडते पुढे मराठी निबंध बघणार आहोत. संध्याकाळची वेळ होती. एक तरुण आई आपल्या एक-दीड वर्षाच्या बाळाला चालायला शिकवत होती. त्याचा हात हातात धरून तोंडाने म्हणत होती,
'चाल चाल माते ।
पायी मोडले कांटे।।'
बाळ बिचकत, अडखळत, धडपडत पाऊल पुढे टाकत होतं. आई बाळाला प्रोत्साहन देत होती, पण पायी मोडणाऱ्या काट्यांची त्याला जाणीव निर्माण करून देत होती. जणू काही माय मराठीच! मराठी सुपुत्राला सांगत होती, 'चालताना पायात मोडणाऱ्या काट्याचे भान ठेव.
जीवनातल्या वाटचालीचा अवघडपणा प्रत्यक्ष अनुभव. आयुष्यात चालणे, गती घेणे अपरिहार्यच. रस्त्यात काटे येणे, अडचणी येणे हेही अटळ. पण संभाव्य धोके ध्यानात घेऊनच तू हे पहिले पाऊल टाक. मग दुसरे... तिसरे पाऊल! विकासाच्या, प्रगतीच्या वाटा मग तुझ्याच आहेत.
आनंदाने प्रयत्नांची कास धरून मार्गक्रमणा कर.' हे सांगणारी आईच. मराठी माती. याच मातीच्या कणाकणातून, महाराष्ट्रीयन मातांच्या कुशीतून जन्म घेतले शेकडो वीरांनी, वीरांगनांनी, साहित्यिकांनी, क्रांतीकारकांनी, सिने-नाट्य कलावंतांनी, कृषीवलांनी, संतांनी, राज्यकर्त्यांनी, उद्योजकांनी, समाजसेवकांनी, सैनिकांनी, कारखानदारांनी नि शिक्षण महर्षीनीही!
हे सुपुत्र मोठे झाले. गोदा, भीमा कृष्णेच्या अमृतपान्ह्यावर! स्वाभिमानाच्या, स्वावलंबनाच्या स्तन्यावर, त्यांच्या अंगी आला ‘मराठी बाणा'! महाराष्ट्राचा जयजयकार त्यांच्या नसानसात भिनला. 'भव्य हिमाचल तुमचा आमचा, केवळ माझा सहयकडा' असे म्हणत महाटी गौरव गाथा उंच उंच जाऊ लागली.
आठशे वर्षांपूर्वी लहानग्या ज्ञानदेवांनी संस्कृत भाषेतली क्लिष्ट भगवद्गीता सोप्या अलंकारिक मराठी भाषेत लिहून महाराष्ट्राची कीर्ती भारतभर दुमदुमवली. मराठी कानाकोपऱ्यात, हृदयात पोचवली. संत नामदेव, तुकाराम, एकनाथ जनाबाई, मुक्ताई ह्यांनीही पताका स्वत:च्या खांद्यावर घेऊन मराठी धर्म वाढवला.
समर्थ रामदासांनी बलोपासनेचे महत्त्व मराठी मनांवर ठसवले. मनाबरोबर, शरीर बलवान असेल, तरंच आत्मविश्वास वाढून निभाव लागू शकतो हेही! 'खबरदार जर टांच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या' म्हणणारे निधड्या छातीचे मर्द मराठे त्याच काळात तयार झाले.
तोफेचे आवाज ऐकेपर्यंत खिंड लढवणारे बाजी, शिर धडावेगळे झाले तरी शंभर मोगलांना धूळ चारणारे मुरारजी, कोंडाण्यासाठी सिंहासारखे लढणारे तानाजी, सात मावळे घेऊन मुघलांच्या अजस्र सेनेला भिडणारे प्रतापराव या मातीतलेच! ‘शंभूराजे आम्ही पेटाऱ्यातून निघतो.
काळजी घ्या, असं म्हणणारं हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय, व त्यांना 'निश्चयाचा महामेरू, बहत जनांसी आधारु, श्रीमंत योगी' अशा पदवीप्रत घडवणारी जिजाऊही मराठीच! हिंदू धर्म राखण्यासाठी एक एक अवयवासह देहाचे बलिदान करणारा 'वीर संभाजी' या मातीतच जन्मला. आजही ह्या शूर मराठ्यांचे वंशज शिर तळहातावर घेऊन, रक्षणार्थ भारतीय सीमांवर डोळ्यात तेल घालून उभे आहेत.
'मराठा इंफन्ट्री' व 'महार रेजिमेंट'च्या रूपाने! अटकेपार झेंडा लावणारे राघोबादादा, साम्राज्यविस्तारासाठी चहुदिशांना रण माजविणारे बाजीराव पेशवे, मुघलांचे पानिपत करणारे मल्हारराव होळकर आपल्या पुण्यातले तर सुराज्य स्थापित करणाऱ्या अहिल्याबाई सातारच्याच!
ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीच्या लढ्याचे शिंग फुकले. नाशिकजवळील भगूरच्या विनायक दामोदर सावरकर या तरुणाने. आगरकर, लो. टिळक ह्यांच्या जहाल वाणीने व लेखणीने ब्रिटिशांचे ‘डोके ठिकाणी राहिले नाही'. टिळकांना कारावास झाला. स्वातंत्र्यवीराना काळेपाणी', पण ही मराठी माणसं पुढे पुढे जात राहिली. कितीही विघ्नं, बाधा, अडचणी आल्या तरी मागे हटली नाहीत.
क्रांतिकारकांनी कोलू ओढला, काथ्या कुटला, उपासमार सहन केली, शारीरिक हाल सोसले, पण शरण जाणं ह्या रक्ताला माहीतच नाही. 'मोडेन पण वाकणार नाही' हाच तो मराठी बाणा. राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्सची भरारी डोळ्यांसमोर ठेवणारा. मराठी माणूस आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, मागे नाही.
उद्योजकांच्या मालिकेत ओगले, शंतनुराव किर्लोस्कर आघाडीवर आहेत. केशवलक्ष्मी प्रसाधन, बेडेकर, चितळे बंधु मिठाईवाले, केसरी टूर्सच्या संचालिका वीणा पाटील ह्यांनी शून्यातून कारभार वाढवण्याचा आदर्श सर्वांपुढे ठेवला. बाबूराव पेंटर, दादासाहेब फाळके ह्यांनी अथक परिश्रमांनी मराठी सिनेमा उभारला. 'प्रभात' चित्र चे मालक व्ही. शांताराम आजही सिनेसृष्टीत गुरू समजले जातात.
ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे, शांता आपटे, सुलोचना, स्मिता पाटील व चंद्रकांत गोखले, पु. ल. देशपांडे, राजा गोसावी. राजा परांजपे ह्या अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी नाट्यसंगीताचा बाजच वेगळा गानसम्राज्ञी लतादीदींचे गायन तर सर्व सीमा पार करून जगप्रवासच करीत असते.
कविवर्य विंदा करंदीकर, कुसुमाग्रज ह्यांना 'ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. आकाशमंडलातील एक तारा कुसुमाग्रज' नावाने नामांकित केला गेल्याने महाराष्ट्राच्या माथ्यावर मानाचा तुराच खोवला गेला.
विडंबनकार आचार्य अत्रे, केशवसूत, बालकवी, श्री. ना. पेंडसे, ग. प्र. प्रधान, ब. मो. पुरंदरे, पु. ल., सरोजिनी वैद्य, शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर अशा किती मराठी सरस्वतीउपासकांची नावे घेऊ? खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, महासंगणक निर्माते विजय भटकर ह्यांना कोण विसरेल?
राजकारण धुरंधर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सहकार तत्त्व मनामनात रुजवणारे कृषीप्रेमी शरद पवार, संसदपट्ट विठ्ठलराव गाडगीळ, मधु दंडवते, मृणाल गोरे, अनत अडचणींवर मात करून कोकणरेल्वे प्रत्यक्षात आणणारे महाराष्ट्रातले अभियंते ह्यांनीही मराठी माणसाची मान ताठ केली.
प्रबोधनकार बाळ ठाकरे ह्यांची बुलंद गर्जना तर महाराष्ट्रातून दिल्ली तटापर्यंत जाऊन भिडते. थोर समाजसेवक बाबा आमटे, शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी, शिक्षण महर्षी विखेपाटील हे सर्व मराठीचेच सुपुत्र.
या सर्वांवर कडी चढवली ते खानदेशकन्या माननीय प्रतिभा पाटील ह्यांनी! भारताच्या प्रथम नागरिक... म्हणजे राष्ट्रपतीपदावर त्या विराजमान झाल्यात. अजून काय हवे? मराठी पाऊल पडते पुढे, हेच खरे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद