मूल्यशिक्षण आणि संस्कार मराठी निबंध | Moolyashikshan ani Sanskar essay in Marathi

मूल्यशिक्षण आणि संस्कार मराठी निबंध | Moolyashikshan ani Sanskar essay in Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मूल्यशिक्षण आणि संस्कार मराठी निबंध बघणार आहोत.  


नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदु भूमे सुखं वर्धितोहम्।

 महान्मंगले पूर्ण भूमे त्वदर्थे  पतत्वष कायो नमस्ते नमस्ते ।।


मातृभूमीच्या ह्या नमनाने शरीर रोमांचित होते. भारतभूमीच्या जयघोषाने मन पुलकित होते. पण अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने, आहुतीने स्वतंत्र झालेली ही भूमी खऱ्या अर्थाने सुखी करण्यात आपण यशस्वी झालोत? आहे आज भारतमातेच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद? नाही ना? "शंखला पायीच राहिल्या, आसवे ओंजळीत पडली


'रक्षक' होऊनी 'भक्षकांनी' भूमी तिळ तिळ कुरतडली" अशी 'बिचारी' अवस्था आहे तिची. स्वातंत्र्य मिळाले खरे पण देशप्रेमाने पेटलेली माणसे आज अभावानेच दिसू लागली. सत्ता व संपत्ती मिळविण्यासाठी नीतिमत्ता विसरली गेली. खुर्चीसाठी लाचारी, लाथाळी सुरू झाली. 


कर्तव्यशीलतेची जागा कामचुकारपणाने घेतली. आज बळजोरी, अनाचार, भ्रष्टाचार यालाच भाव आहे. व्यसनाधीनतेत शान आहे. ऊँचे लोग, ऊँची पसंद' म्हणत गुटख्याच्या पुड्यांचा युवकांच्या खिशात वावर आहे. चंगळवादी वृत्ती, भोगवाद, लालसा, समाजात चढत्या भाजणीने वाढत आहे. 


तंत्रज्ञानामुळे माणसाचे सामर्थ्य वाढले, तो सुखवस्तू झाला. दुसऱ्याला, अगदी निसर्गाला सद्धा तुच्छ मान लागला आणि त्याच्या अध:पतनाची नांदी सुरू झाली. त्यात... स्वार्थांध राज्यकर्ते, वडीलधाऱ्यांची शिथिल वागणूक विचार व आचार यातील रुंदावत गेलेली दरी, कर्तव्यभावनेचा हास, अन्यायाकडे कोडगेपणाने पाहण्याची निर्लज्जवृत्ती, मगरूर सवयी ह्यांनी प्रत्येकाला घेरलेले आहे. 


हल्ली कोणतेही वर्तमानपत्र उघडून पाहिले असता खून, मारामाऱ्या, अत्याचार, वासनाकांड, बालगुन्हेगारी, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, गुंडगिरी, खंडणी  वसलीकरण, दहशतवाद, गँगवार... इत्यादी समाजविघातक बातम्यांचेच रकानेच्या रकाने भरभरून वाहतात. 


अशा पूर्णपणे प्रतिकूल वातावरणात सन्मार्ग, सचोटी, सत्शीलता, प्रामाणिकपणा, सहकार्यभावना, परधर्माचा आदर यावर विश्वास ठेवणे ही गोष्टच नुसती पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित वाटू लागते. आम्हा विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करता, जे जे पाहिले, वाचले, ऐकले जाईल, त्याचेच चिरंतन ठसे आमच्या मनावर खोल उमटले जातात. 


या वयातच योग्य दिशा व मार्गदर्शन लाभले नाही, तर हा पूर्ण वयोगट संस्कारहीन, व्यसनांध होऊन अथांग अशा महासागरात भरकटलेल्या दिशाहीन नौकेप्रमाणे भरकटलेला आढळून येतो. मग मुले दिसतात सायबर कॅफेमध्ये. इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानलालसा वाढवून त्यात वृद्धी करण्यापेक्षा अश्लील, बीभत्स दालने उघडतात. 


त्यात गुरफटतात. त्यातून मनोरुग्ण निर्माण होतात. मग ह्या पिढीकडून समाज उभारणी, राष्ट्रोद्धार कार्यात काय अपेक्षा करावी? आणि Children are the promise of the future. They must be trained to reveal the treasure that is in human soul! स्वामी विवेकानंद म्हणतात, “संपत्तीचा हास झाला तर फारसे कचरण्याचे कारण नाही.


 प्रकृतीचा हास झाला तर तो चिंतेचा भाग आहे. मात्र चारित्र्याचा अन मूल्यांचा हास झाला तर तो सर्वनाश ठरेल!' नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन ह्यांचेही मत तेच व तसेच आहे. आजचे चित्र बदलण्यासाठी, मानवी कल्याणासाठी विकसित झालेल्या मानवी मूल्यांचा समाजातील व्यक्ती व्यक्तीमध्ये परिपोष होण्याची आज नितान्त गरज आहे. बालमनावर सर्वाधिक मूल्यसंस्कार होतात ते घरात. 


प्रत्येक मूल अनुकरणप्रिय असते. त्यासाठी मातेने व नंतर घरातील प्रत्येकाने सजग राहावयास हवे. सत्य, प्रामाणिकपणा, संयम, सहकार्य, बंधूता, प्रयत्न, श्रमप्रतिष्ठा, समता, विवेक ही मूल्ये तर 'घर' नावाच्या मंदिरातच ठसवली जातात. पुढे ज्ञानमंदिरात, शिक्षणाने योग्य मूल्यांची पुन: रुजवणूक व संवर्धन होते. 


घर, शाळा व समाज विद्यार्थ्यांवर अनौपचारिकपणे सुसंस्कार घडविणारी पवित्र व प्रमुख केंद्रे आहेत. तथापि, स्वातंत्र्योत्तर काळात ह्या पवित्र केंद्रांचे पावित्र्य, ध्येय यात बरेचसे बदल झालेले दिसतात. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरातील आजी-आजोबांसारख्या ज्येष्ठांचा अभाव, अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेली स्त्री, महागाईची चढती कमान ह्यांमुळे घरकुल 


संस्कार ही जवळ जवळ डळमळीत संस्था झाली. बाजारात येणाऱ्या नव्या कॅसेट्स, व्यावसायिक संस्कारवर्ग हे त्या संस्थेची जागा घेऊ शकत नाहीत. संस्कारांची धुरा घरानंतर विद्यामंदिरांवर येते. शिक्षण ही जीवनाच्या सर्वांगाची सर्वस्पर्शी विचारधारा आहे, पण विद्यार्थी आज ज्ञानार्थी नव्हे फक्त परीक्षार्थी झालाय. 


तो जर ज्ञानवंत व गुणवंत बनण्याचा अट्टाहास करील तर... अस्तित्वाच्या स्पर्धेतून 'बाद' होण्याचीच भीती जास्त. खरंतर, Education is not what person learns, but what he becomes! शिक्षण म्हणजे दळण नव्हे, वळण आहे! शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. एकीकडे बौद्धिकतेची विलक्षण झेप, तर दुसरीकडे सुसंस्कृतपणा, नैतिकता, धार्मिकता ह्यांचा हास! 


ह्यासाठीच मूल्यशिक्षणास... सुसंस्कृत मानवी जीवनाच्या दृष्टीने... नियमन करणाऱ्या महत्त्वाच्या जीवनोपयोगी मूल्यांच्या अंगीकारास पर्याय नाही. . मुलांचा बारा ते सोळा वर्षांपर्यंतचा काळच संवेदनशील, संक्रमणशील व निर्णायक असतो. श्री. ना. सी. फडके म्हणतात, 'मानवी जीवनाच्या पतपेढीत बचत करण्याचा व संचय वाढवण्याचा काळ म्हणजे यौवनावस्था. 


यात चांगली बचत केलीत, तर तुमचा भविष्यकाळ सुखात जाईल.' महात्मा गांधीनींही सप्तदोषांवर मात करण्यासाठी, मानवतावादाची बीजे घट्ट रुजवण्यासाठी, राष्ट्रविकासासाठी मूल्यशिक्षणाची गरज शालेय वयातच आहे, असे म्हटले आहे. मूल्यशिक्षणाच्या समावेशाचे तत्त्व प्राचीन काळातील ऋषीमुनींपासून ते आजच्या विचारवंत शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच मान्य केले आहे.


आज समाजात जाज्वल्य राष्ट्रभक्ती अगदी अभावानेच आढळते. एखाद्या राष्ट्रीय पुरुषांची जयंती, पुण्यतिथी बळजबरीने साजरी करणे, दिवंगत राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारून नंतर त्यांची दखलही न घेणे, ही राष्ट्रभक्ती नव्हे! अर्थात जो देश दीडशे वर्षे परकीयांच्या गुलामगिरीत राहतो त्या गुलामगिरीचे संस्कारही लगेच जाणार नाहीत.


परिवर्तन हे एकदम होणार नाही, परंतु शाळांमधूनच या बालचमूंमध्ये देशभक्तीला प्राधान्य देऊन स्फुल्लिंग चेतवले तर .... कोणे एके काळी मूठभर मराठ्यांनी दहा-दहा हजार मोगलांवर केलेल्या हातघाईच्या लढाईवरचा त्यांचा विश्वास दृढ होईल.


राष्ट्र समर्थ बनविण्यासाठी सर्वधर्मसमभाव, धर्म सहिष्णुता, विविध जातीजमातींबद्दल सौहार्दधोरण अवलंबिले, तर स्थैर्य, शांतता, सुव्यवस्था आपोआप  नांदू लागेल. विद्यार्थ्यांना मेहनतीची सर्व कामे सारख्याच मोलाची वाटली पाहिजेत. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे शारीरिक कष्ट अथवा ऑफिसमध्ये वातानुकलित केबिनमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरचे बौद्धिक कष्ट हे समानच प्रतिष्ठेचे आहेत, हे मनावर बिंबले पाहिजे. 


व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छता ह्यासाठी नीटनेटकेपणा हे मूल्य आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांडाचे स्तोम, अनिष्ट रुढी, परंपरंचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य ह्या मूल्यशिक्षणात आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रशक्ती, एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, स्त्री-पुरुष समानता, सौजन्य-शीलता, वक्तशीरपणा व नीटनेटकेपणा ह्या मूल्यांचा मूल्यशिक्षणात समावेश केलाय.


संस्कृती व मूल्ये ह्यांचे जीवाशिवाचे अतूट नाते आहे. असे म्हणतात, संस्कृतीतून मूल्ये जन्म घेतात. मूल्यांमधून संस्कृती समृद्ध होते. मूल्यांचा महावटवृक्ष हा संस्कृतीतच ताठ उभा राहतो. थोर सज्जनांचे आदर्श आम्हापुढे आहेतच. 


सावरकरांची देशभक्ती, महात्माजींची सत्यप्रियता, किरण बेदींचा बेडरपणा, मदर तेरेसांचे सेवाकार्य, लता मंगेशकरांचे कठोर परिश्रम, अटलजींची निर्भय निर्णयशक्ती, अब्दुल कलामांचा दुर्दम्य प्रयत्नवाद, कारगिलचे 'ऑपरेशन विजय' यशस्वी करणारे पराक्रमी वीर आपल्याच देशातील आहेत. 


आता प्रत्येक नागरिकाने शिक्षकाची भूमिका बजावून एक पाल्य-उद्याचा नागरिक-मूल्यशिक्षित करावा. यासाठी कठोरपणाने आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. एक दिवस समाजाचे चित्र पालटेल. सुशिक्षित, मूल्याधिष्ठित सुजाण नागरिक तयार होतील. 


त्यांचे मन सद्वर्तनाने नांगरले जाईल, प्रेमाच्या पाण्याचे त्यावर सिंचन होईल आणि पुन: एकदा 'आनंद वन भुवनी...' असे निश्चित म्हणता येईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद