निसर्ग आणि मानव निबंध |Nisarg Aani Manav Nibandh Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निसर्ग आणि मानव मराठी निबंध बघणार आहोत. निसर्ग आणि मानव एक अतूट नातं! जन्माला आल्यापासून मरेपर्यंत निसर्गच असतो. माणसाचा सखा, सोबती, गुरू... सर्व काही! निसर्गातील मूलभूत तत्त्वांनी, धातुंनी, वायुनी रसायनशास्त्राचे पान अन् पान सोनेरी केले. भौतिकशास्त्राची जराशी क्लिष्ट नी रुक्ष इमारत निसर्गातील सिद्धांतावरच उभी आहे.
अश्मयुगातील मानव भूगोल, पर्यावरण शिकला तो निसर्गाकडूनच! मानवाला निसर्गाने ‘दो हातांनी' भरभरून दिले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी मानवाला समृद्ध केले. अश्मयुगापासूनच मानव त्यांची पूजा करतो. त्यांना वंदन करतो, कृतज्ञता मानतो. ऋण फेडण्यासाठी निरनिराळे सण साजरे करतो.
पण जसजसे दिवस जाऊ लागले, मानव सुधारणा करू लागला, नवनवे शोध लावू लागला. औद्योगिक क्रांती झाली. शेतीविषयक तंत्रज्ञान विकसित झाले. सारी पृथ्वी जणू काही जवळ आली. 'इको फ्रेंडली' वातावरण नांदू लागले.
पण हे सारे करताना मानव हळूहळू निसर्गाच्या दूर जाऊ लागला. त्याला वाटले की, त्याने निसर्गावर मात केली. दिवसेंदिवस त्याची हाव वाढतच गेली. त्याने निसर्गाला ओरबाडायला सुरुवात केली. सारीच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा निसर्गाने एका-एका घटकाने जणू आपल्या अस्तित्वाच्या खुणा दाखवायला सुरुवात केली. पृथ्वीवर लोकसंख्येचा विस्फोट झाला.
समुद्रावर भरी घालून जमिनी तयार करण्यात आल्या, त्यावर इमारती उभ्या राह लागल्या. नद्यांच्या पात्रांच्या दिशा हव्या तशा वळवण्यात आल्या, मानवाच्या सुखसोयींसाठी! मग मात्र निसर्ग खवळला. त्याने त्सुनामी'चे अस्त्र आपल्या भात्यातून काढले.
या अजस्र विशालकाय लाटांनी गावेच्या गावे गिळंकृत केली. लाखोंना जलसमाधी दिली. २६ जुलैला झालेला पाऊस व पूर मुंबई नगरीची कशी दाणादाण करून गेला, हे कुणी विसरू शकेल? किल्लारी व भूजच्या भूकंपाच्या उद्धस्त खाणाखणा आजही कित्येक अंशी तशाच आहेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही समुद्राने सोडले नाही. रिटा, कॅतारिना ह्या समुद्री वादळांनी या देशाला राहूकेतूसारखे ग्रासले.
इटलीमधील व्हेनिस शहरात समुद्राची जलपातळी उंचावली, ते शहर जलमय होण्याची भीती तर सदा आहेच. वातावरणातील वाढत्या Co, च्या प्रमाणामुळे, सूर्यापासून मिळणारी उष्णता व पृथ्वीपासून उत्सर्जित उष्णता वातावरणातच अडकून राहत आहे व त्यातूनच जन्म घेत आहे... सध्याचा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न ग्लोबल वॉर्मिंग! उत्तर धृवही उच्च तापमानामुळे वितळू पाहातोय. येत्या काही वर्षात मुंबई शहर ही पाण्याखाली जाण्याचा धोका संभवतो.
निसर्ग इतिहासही घडवतो. कोलंबसाने कितीही गर्वाने त्याच्या सैनिकांना लढण्याबद्दल आवाहन केले, तरी त्यांचा लढा आधी नैसर्गिक आपत्तींशी होता. निसर्ग नियमांना तुच्छ लेखणाऱ्या हिटलरसारख्या पाशवी हकुमशहांची, सैन्याची रशियाच्या थंडीत ससेहोलपट झाली.
विज्ञानाच्या शोधांवर मिजास करणाऱ्या मानवावर AIDS सारख्या रोगांपुढे गुडघे टेकायची वेळ आली. क्लोनिंग, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे शोध लावू पाहणाऱ्या हृदय शस्त्रक्रिया करून, इंद्रिये रोपणे करून आयुर्मर्यादा वाढवणाऱ्या माणसाला कळलंच नाही की
Nature loves symmerty! जन्म-मृत्यू, फायदे-तोटे, न्याय-अन्यायाचे पारडे नेहमी तो समतोल ठेवतो. वसुंधरेला डिवचलेलं त्याला आवडत नाही आणि म्हणूनच वैज्ञानिक शोधांना शह देत निसर्ग कधी थंडीची लाट आणून बळी घेतो तर कधी भूकंपाने होत्याचे नव्हते करून माणसे पोटात घेतो.
कधी केवळ फुकर मारून वादळवारे निर्माण करतो, तर कधी वणवे पेटवतो, कधी पूर आणतो. प्रलय आणतो. विजा कोसळवतो, ढगफुटी होऊन पिके उद्ध्वस्त करतो. जनजीवन विस्कळीत करतो. कीटकनाशकांना दाद न देणारे नवे कीटक पैदा होतात. औषधांना दाद न देणारे साथीचे रोग फैलावतात, माणसे दगावतात.
मला वाटतं... निसर्ग पूर, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींद्वारे स्वत:ची विनाशलीला दाखवत असतो, पण परत सृष्टीनाशाच्या दुःखाला, निर्माणसुखात परिवर्तित करण्यासाठी नवीन आशा आणि विश्वास यांबरोबर जोमाने निर्मितीच्या कामात मग्न होते. जणू,
'प्रलय की निस्तब्धता से सृष्टि का नवगान फिर-फिर।'
नीड का निर्माण फिर-फिर, नेह का आह्वान फिर-फिर ।।
अजूनही वेळ गेलेली नाही. 'सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे, ओठांवर झेलू थेंब पावसाचे । त्यामुळे निसर्गाने मानवाला घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून, निसर्गाशी स्पर्धा करण्यापेक्षा, त्याच्याशी मैत्रीचे नाते स्विकारून, परस्पर संबंध अधिकाधिक दृढ करून, आपले पृथ्वीवरील वास्तव्य व भवितव्य अधिक सुखकारक करूयात! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद