पर्यावरण निबंध मराठी | Paryavaran Nibandh Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण मराठी निबंध बघणार आहोत. टी.व्ही.वरच्या बातम्या शेवटच्या टप्प्यात आल्या होत्या. 'हवामानाचा अंदाज' असे टायटल आले. मागोमाग सुंदरशी निळीशार पृथ्वी-स्वत:भोवती गर्रकन फिरणारी पडद्यावरून सरकली.
निळ्याशार पाण्याचे प्रचंड मोठे महासागर, खंडीय बेटे, पर्वतरांगा, दऱ्या-खोऱ्या, हिमाच्छादित शिखरे, महानद्या...किती विहंगम आमची वसुंधरा माता!
धन्य धन्य हे वसुमती ।
इचा महिमा सांगो किती।
प्राणिमात्र तितुके राहती।
तिच्या आधारे ।
मला आठवतं. इयत्ता पहिली, दुसरीत आम्हाला परिसर अभ्यास' हा विषय होता. म्हणजेच आपल्या सभोवतीचा प्रदेश त्या परिसरातील नैसर्गिक, सांस्कृतिक घटकांचे परस्परांशी नाते! आणि आता कळतंय की, ह्या संबंधातूनच निर्माण झालेली परिस्थिती म्हणजेच पर्यावरण! परि आवर्तति, इति पर्यावरण!
मानवी जीवनाचा पर्यावरणाशी फार पुरातन संबंध! पर्यावरणातील गोष्टी एकमेकांवर अवलंबून व परस्परांना पोषक असतात. उदा. वनस्पती कार्बनडायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडतात, तर आपण तो घेतो आणि कार्बनडायऑक्साइड सोडतो.
हीच गोष्ट जलचक्र, नायट्रोजन चक्र किंवा अन्नसाखळीच्या बाबतही खरी ठरते. या निसर्गचक्रांवरच पर्यावरण अवलंबून आहे व पर्यावरणातील सूर्य, तेज, वायू, जल या समर्थ घटकांवर मानवी जीवन! गुहेत आयुष्य कंठणाऱ्या माणसाने मोठ्या वेगाने प्रगती साधली. त्याच्या आकांक्षा वाढल्या, हाव वाढली.
'किती घेशील दो कराने ह्या भूमिकेतून त्याने पर्यावरण ओरबाडले. अक्षरश: असंतुलित केले. निसर्गातील घटकांचा अमर्याद उपभोग घेता-घेता त्याचे भान सुटले आणि निसर्गाचा समतोल बिघडायला लागला, पर्यायाने पर्यावरण व त्यानंतर संस्कृतीचाही हास सुरू झाला.
कवी टेनिसन म्हणतो, 'एक फूल जाणणे म्हणजे विश्व जाणणे' निसर्ग एक जादूगार आहे, गुरू आहे, कलावंत आहे. साहित्यिकांच्या प्रतिभेचा बहर आहे, संतश्रेष्ठींचा परमेश्वर पांडुरंग आहे. शेतात काम करणाऱ्या बहिणाबाई हिरव्या रानात वावरताना म्हणतात
'टाळ्या वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी' सावता माळी म्हणतात, 'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' ऋषीमनींनी निसर्गसान्निध्यात मनाची एकाग्रता साधली. गुरुकुले बहराला आणली. मानवी देह निरोगी, सुदृढ, प्रसन्न हवा असेल, तर निसर्ग व्यापक, विपुल व विशुद्ध तर हवाच! तुकाराममहाराज म्हणतात
'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।' माणसाला निर्भेळ जीवन जगण्यासाठी निसर्गाची साथ हवी. त्यासाठी काय करावे सांगताना ज्ञानोबा म्हणतात.
'नगरेची रचावी। जलाशये निर्मावी।
महावने लावावी। नानाविधे।।'
पर्यावरण रक्षणाच्या कार्यात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पौराणिक ग्रंथातून देवदेवतांना प्रिय वनस्पतींची माहिती आहे. सणावारात, व्रतवैकल्यात वृक्षांना महत्त्व आहे. पूजेसाठी फुलांबरोबर पत्री, आघाडा, रुई, बेल, तुळस, आपटा, आंबा व विड्याच्या पानांना महत्त्वाचे स्थान आहे.
वटपौर्णिमेला वड, दत्तजयंतीला उंबर, मुंजासाठी पिंपळ या वृक्षांची पारंपारिक पूजा दुसरे काय सांगते? श्रीकृष्णाच्या काळात पर्जन्यासाठी इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी गोवर्धन पर्वताची पूजा होत असे. ज्ञानेश्वरीत वृक्षाला कर्मयोगी म्हटले आहे. मनस्थिती विषण्ण असेल, तेव्हाही वृक्ष मनास ताजेपणा देतात. कवयित्री इंदिरा संत म्हणतात,
'जरी वेढिले चार भिंतीनी, या वृक्षांची मजला संगत।' थोडक्यात काय, तर देवाने दिलेले हे सुंदर विश्व सर्वांनाच अनुभवायचे आहे, जपायचे आहे, वाढवायचे आहे. कवी ग. ह. पाटील देवाची कृतज्ञता मानताना वर्णितात ह्न देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो ,
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर वेलीची, संदर ही फुले.' वास्तवात मात्र...हे सुंदर चित्र नेमके उलटे झालेले दिसते. मानव जपतोय का या सौंदर्याला ? हस्तीदंतासाठी हत्तीची, शिंगांसाठी सांबरांची, कातड्यासाठी वाघांची, पैशासाठी सुंदर पशुपक्ष्यांची हत्या सर्रास करतोय.
लोकसंख्या अफाट वाढलीय, मानवाला राहायला जागा पुरेना! शेतीला जमीन पुरेना! मग या दुष्ट मानवाने निसर्गावर, जमिनीवर, नद्यासागरांवर अतिक्रमण केले. मुंबईचेच ताजे उदाहरण घ्या ना! एकेकाळी सात बेटांवर वसलेली नारळी पोफळींनी वेढलेली ही मुंबापुरी आता किती दैन्यावस्थेत आहे.
कारण मुंबईतल्या नदीचे मुख, तिचे पात्र बुजविले. तिचा प्रवाह स्वार्थासाठी बदलला. समुद्रात भराव घालून भरावांवर उंच इमारतींचे इमले उभे केले गेले आणि हाय दुर्दैव! यंदाच्या पावसाळ्यात कधी नव्हे ते पाऊस जास्त पडला, तर मुंबईत हाहाकार झाला.
दुसरं उदाहरण दक्षिण भारतात येऊन थैमान घालणारे सुनामी लाटांचे तांडव! न्यू ऑर्लिन्सला येऊन थडकलेली कॅतारिना' व 'रीटा' ही राक्षसी वादळे! कोण जबाबदार आहे या व अशा नैसर्गिक आपत्तींना? मानवी जीवन 'सुजलाम सुफलाम् करणाऱ्या नद्यांनाच जर डिवचले गेले, तर त्यांची शक्ती त्या दाखविणारच! नद्यांबद्दलचा पूज्यभाव आळविताना कवी चंद्रशेखर म्हणतात,
'तुज हृदयंगम रमे विहंगम, भाट सकाळी आळविती।
तरु तिरीचे तुजवरी वल्ली पल्लव चामर चाळविती।।
तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू अरुण करी।
जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवताप हरी।।'
भवताप हरणाऱ्या या नद्यांनाच मानवाने भयानक प्रदूषित केले आहे. कारखान्यातील दूषित द्रव्ये, विषारी रसायने, निर्माल्य, सांडपाणी, मृतदेह, अस्थिरक्षा या साऱ्यांनी नद्यांचे पाणी पिण्यायोग्य नव्हे तर रोगराईयुक्त केले आहे. आपला देश कृषीप्रधान देश! शेतीव्यवसाय, पशुधन हेही पर्यावरणावरचं अवलंबून आहे ना? समर्थ रामदास म्हणतात,
'धन धान्याचे संचित ।
करणे लागे अवचित ।
नाना पशुते पाळावी ।
नाना कृत्ये सांभाळावी।'
पिके घेताना शेतकऱ्यानेही जमिनीत वारेमाप खते, कीटकनाशके, जंतुनाशके वापरायला सुरुवात केली. अहो, गायीला पान्हवायला देखील औषधांचा वापर सुरू केला. भाजीपाला, फळे यांना अंतर्बाह्य विषारी केले. बियाणे संकरित केले.
पर्यावरणात अर्थात पर्वतरांगाही येतात. वर्षाराणीला ओढून आणणाऱ्या पवताना त्याचे वैभवशाली स्वरूप प्राप्त व्हायला हवे. सर्वत्र उघडे पडलेले. ओसाड डोंगर हिरव्या वनश्रीने नटावेत. औद्योगिकरण व इतर कारणांपुढे पर्यावरणाचा हास झाला. त्याचे भीषण परिणाम आपण भोगतोच आहोत. तेव्हा ढासळता तोल जागरूक होऊन आपणच सावरायचा आहे.
औद्योगिकरणाला पायबंद घालणे तर मूर्खपणा आहे, पण सुवर्णमध्यही गाठायला नको का? शासनही आता जागरुक झाले आहे. सामाजिक वनीकरण', ‘एक मूल, एक झाड', 'झाडे लावा, देश वाचवा' या योजनांतर्गत अनेक उपक्रम राबवते. पण कधीकधी भ्रष्टाचाराचा किडा योजनांना पोखरतो. पैसा खाल्ला जातो. डोंगर उजाड राहतात, माळराने पोरकीच राहतात, हे दुःख!
आता आशा आहे उद्याच्या नागरिकाकडून, उद्याच्या प्रामाणिक प्रशासकाकडून! म्हणूनच आम्ही बालांनी शपथ घ्यायला हवी. 'चला सोडवू दुष्काळाचे, प्रदूषणाचे कोडे, चला लावूया वनसंपत्ती, चला लावूया झाडे.' 'Green earth and clean air, are they not our prime care ?
या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी पाणी, ऊर्जा, खनिजे, वायू सर्वांचे रक्षण करू. काटकसरीने वापरू. म्हणूनच... "शपथ घेऊया सारे मिळूनी, पर्यावरणाचे पूजन करू, नच माज करू या जलधारांचा, वृक्षांचा सन्मान करू, अजून आहे वेळ गड्या रे, संकट समय जरी बिकट ठाकला
वने तगवू सृष्टी फुलवू, आळवून मेघ मल्हाराला" आणि मग...समर्थांच्या शब्दात...या भारतवर्षात... 'कामधेनूची खिल्लारे, कल्पतरूंची वने आवारे अमृताची सरोवरे, उचंबळो ठायी ठायी।' हीच ईश्वरचरणी प्रार्थना! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.