शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मराठी निबंध | Shuddh Bijapoti fale Rasal Gomati Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मराठी निबंध बघणार आहोत. शेतकरी बी पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करतो. जमिनीत माजलेले तण, गवत हलकेच काढून टाकतो. मातीचे थर खाली-वर करतो. उन्हाने माती तापू देतो.
खते घालतो. बियाण्याला कीड लागू नये म्हणून कीटकनाशकांची पावडर चोळतो मगच पाभाऱ्याने खोलगट जागा करूनबी जमिनीत पेरतो. दुसऱ्याच दिवशी हलकेसे पाणी देतो आणि मग काय जादुई किमया होते, ओलाव्यानं बी रुजते, अंकुरते. त्याची इवली दोन पोपटी पाने जमिनीच्या वर येतात जणू दोन हातांनी टाळ्या वाजवत. हेच रोप जोमाने वाढते,
त्याला मोत्याच्या दाण्यांचे कणीस लगडते जणू दोन हातांच्या ओंजळीतून दान देण्यासाठीच. पेरलेला एक दाणा ओंजळभर दाणे घेऊन येतो अर्थात जेव्हा आपण त्या एका' दाण्याची नीट काळजी घेऊ, त्याची निगराणी करू तेव्हाच आणि तो दाणा शुद्ध असेल तेव्हाच! शुद्ध बीजातच वृक्षाचं मूळ दडलेलं असतं. मात्र एकाच मातीत शेजारी शेजारी लावली तरी लिंबोणीला लिंबू व चिकूच्या झाडाला चिकूच येतात.
लिंबाचा आंबटपणा चिकू घेत नाही आणि स्वत:चा आंबट गुणधर्म लिंबोणी चिकूला देत नाही. ही माती कडुनिंबाला कडूपण पण उसाला साखरेची गोडीच देते. आंब्याच्या कोयीला पेरूचं झाड फुटत नाही ह्यावरून निसर्गच सांगतो, 'पेराल ते उगवेल'. धोतऱ्याच्या बीला कधी अमृतवेल लागेल? त्यातून विषवल्लीच उपजणार.
'एरंड धोतरा पेरून, करू पाहे अमृतपान पेरिले ते उगवे रे ।' असं वीरशैव लक्ष्मणमहाराजही म्हणतात. कारल्याचा वेल गगनावर पोचला, तरी त्याला आंबे कुठून लागणार? म्हणजेच दुष्कृत्ये केली, अनाचार केला, अनीतीने वागलात, तर त्याचे परिणाम वाईटच होणार.
मनामध्ये द्वेष, तिरस्कार, राग, त्वेषाची बीजं असतील, तर डोळ्यांवाटे चेहऱ्यावर तेच भाव उमटणार. हास्याची लकेर नव्हे, कपाळी आठ्यांचे जाळेच असणार! सदोदित कटकट करणारे, लोकांमध्ये न मिसळणारे, दुसऱ्याच्या सुखद:खाला आपले न मानणारे लोक समाजही जवळ करीत नाही. याउलट सदैव मनात हृदयात समाधान नांदले, मैत्र भाव रुजवला, जोपासला, तर अगणित सुहृदांनी घर भरून जाते.
परोपकार, जनसेवा, सहकार्य ही तत्त्वे अंगीकारली, अडल्या-नडल्यास मदतीचा हात दिलात तर प्रसंगी आपल्याला मदतीचा ओघ येतो. जिभेवर गोडवा, वाणीत माधुर्य, हृदयात प्रेमळपणा असेल तरच माणसे जवळ येतात. रागीट फुत्काऱ्यांनी नव्हे, विषारी काटेरी भाषेमुळे तर नव्हेच!
'कर भला, होगा भला, अंत भलेका भला' हा त्रिकालाबाधित नियम आहे. थोर वैज्ञानिक न्यूटननेही सिद्ध केलंच की, क्रिया व प्रतिक्रिया ह्या बलानं नेहमीच समान पण विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या असतात. म्हणूनच दुसऱ्याबद्दल जो वाईट चिंततो त्याचं वाईटच होतं, चांगलं होत नाही. वाईट चिंतणं, छिद्रान्वेषी असणं, असमाधानी असणं हे वाईट संस्कारच! आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात.
जे स्वत: मात्र चांगुलपणानं वागत नाहीत पण बदल्यात त्यांना मात्र नेहमीच मानपानाची अपेक्षा असते. गणेशोत्सवात वर्गणी द्यायला हे लोक ‘कांकू' करतात पण सायंकाळच्या आरतीचा पहिला मान मात्र त्यांना हवा असतो. शेजारच्या वृद्ध आजींकडे स्वत: कधी लक्ष देत नाहीत, पण आपल्या आजारी मुलाच्या चौकशीला येऊन शेजाऱ्यांनी शेजारधर्म पाळावा अशी त्यांची अपेक्षा असते.
एकदा चार वर्षांची जुई व तिच्या आईमधला संवाद मी ऐकला, जुई आईला म्हणत होती, मला तुझा कंटाळा आलाय. मला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर मोठी झाल्यावर मीही तुला आजी-आजोबांसारखं वृद्धाश्रमात टाकीन! अर्थात जुईच्या आईने काही कारण नसताना सासू सासऱ्यांना अडगळ समजून वृद्धाश्रमात ठेवले होते. हेच संस्कार जुईच्या मनात नकळत पेरले गेले होते. जुईच्या आईचे डोळे उशीरा का होईना उघडले होते.
पण...'करनी करे करके भरे करके क्यू पछताएँ? बीज बोए बबूलके तो आम कैसे पाएँ? बाभळीच्या बिया पेरून येणाऱ्या वृक्षाला आम्रफळ कशी लागतील? 'श्यामच्या आईच्या पोटी श्यामच, जिजाऊंच्या पोटी शिवबाच जन्माला येतो. ज्या मातापित्यांनी पुत्रजन्माआधीच सुराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मनी पाहिले, तेच बीज उदरात वाढले. तेव्हा शिवबाचा ‘राजा शिवछत्रपती' झाला.
शुद्ध संकल्पाचे फळ ।
करी ब्रह्मचि केवळ ।
वृत्ती व स्वभाव सद्गुणी असेल, संकल्प कल्याणकारी असतील तर सुख, शांती, समाधानाची फळं-फुलं निश्चित बहरतात. प्रयत्नांचं बीज पेरलं तर यशोकीर्तीची फळं मिळतात. आळसाच्या बीजाला झाड आलं, तरी फळं काय साधी पानंही येत नाहीत. लोहाच्या खाणीतून लोह नि सुवर्णाच्या खाणीतून सुवर्णच मिळते. जशी खाण तशीच माती मिळते. आई जर दुर्धर रोगाने पीडित असेल तर मूल रोगटच निपजते.
आई जर क्षयाने, एड्सने ग्रासलेलेली असेल, तर बाळाच्या जीवनाला रोगाचे ग्रहण लागणारच. काही अनुवांशिक रोग तर आईकडून बाळाकडे नियमाने संक्रमित होतात. धष्टपुष्ट निरोगी मातापित्याच्या पोटी, सशक्त मानसिकता बाळगणाऱ्यांच्या उदरी, गोमटी, साजिरी, गोजिरी व निरोगी बाळेच जन्म घेणार. मनाचा आणि शरीराचा अन्योन्य संबंध सांगताना, ज्ञानेश्वर माऊलीही सांगतात,
जे भुईबीज खोविले।
तेचि वरि रुख जाहाले।
तैसे इंद्रियद्वारा फांकले।
ते अंतरचि की।
पेरलेल्या बीजाचा वृक्ष होतो; त्याप्रमाणे इंद्रियांच्याद्वारे जे घडते, ते पूर्णपणे मनाच्या वृत्तींचेच प्रतिबिंब असते. आपले कर्तव्य आहे की, उत्कट संस्कारांची बीजं मनोमनी पेरणं, त्यांना संरक्षित, अबाधित ठेवणं नि सुजाण नागरिकांच्या निर्मितीस मदत करणं. माणुसकीचे, श्रमांचे, अभ्यासाचे बीज पेरून सशक्त समाज निर्माण करणं. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद