क्रांतिकारक भगतसिंग निबंध मराठी | Bhagat singh essay in Marathi

 क्रांतिकारक भगतसिंग निबंध मराठी | Bhagat singh essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  क्रांतिकारक भगतसिंग मराठी निबंध बघणार आहोत. इतिहास हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे. कारण यातूनच आपल्याला आपल्या थोर नेत्यांची ओळख होते. राणी लक्ष्मीबाईच्या शौर्यापुढे माझी मान नतमस्तक होते. गांधीजींचे चारित्र्य व सत्यप्रियता यामुळे मी भारावून जाते. परंतु, तरीही सर्व भारतीय नेत्यापैकी माझा आवडता नेता आहे, थोर क्रांतीकारक सरदार भगत सिंग. 


भगत सिंग हे भारतीय स्वतंत्रता चळवळीतील एक आद्य क्रांतीकारक होत. त्यांचा जन्म लायलपुरी येथे २७ सप्टेंबर १९०७ साली झाला. त्यांच्या आईचे नांव विद्यावती व पित्याचे नाव किशन सिंग होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोर येथे झाले. 


त्यांचे वडील व काका सरदार अजीत सिंग हे स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. त्यामुळे घरात पूर्णपणे देशभक्तीचे वातावरण होते. ब्रिटिश राजसत्ता उलथून टाकण्याचे स्वप्न त्यांनी बालपणीच पहाण्यास सुरुवात केली. लहान असताना त्यांना बंदूकींची शेती करायची होती, म्हणजे ते ब्रिटिशांविरुद्ध लढाई करु शकतील. 


महात्मा गांधीच्या असहकार चळवळीत ते तरुणपणीच सामिल झाले होते. भगतसिंग हे सोशालिस्ट व रिपब्लिकन होते. भारताला स्वतंत्र करायचे असेल तर क्रांतीचाच मार्ग स्वीकारला पाहिजे असे त्यांचे मत होते. 'इन्किलाब जिंदाबाद' ही घोषणा देणारे ते पहिले क्रांतीकारी होते. 


त्यांच्या लिखाणातून त्यांनी क्रांतीचा संदेश दिला. जलियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. समविचारी मित्रमंडळी व क्रांतीकारकांच्या शोधात असतानाच राजगुरु व सुखदेव यांच्याशी त्यांची भेट झाली. चंद्रशेखर आझाद यांच्या मदतीने त्यांनी हिंदूस्तान सोशालिस्ट रिपब्लिक पार्टीची स्थापना केली. 


या सोशालिस्ट पार्टीचे उद्दिष्ट फक्त भारताचे स्वातंत्र्य एवढेच नसून सोशालिस्ट भारत निर्माण करण्याचे होते. लाला लाजपतराय यांच्यावर ब्रिटीश पोलीसांनी अंदाधुंद लाठीहल्ला केला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येचा सूड घेण्यासाठी भगतसिंग यांनी साँर्डहस्ट या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला व त्यानंतर लाहोरबाहेर गेले. 


त्यानंतर ब्रिटिश सरकारने 'ट्रेड यूनियन डिस्प्यूट बिल' व 'पब्लिक सेफ्टि बिल' पास केल्यानंतर भारतीयांना त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने त्यांनी व बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बाँबस्फोट केले. यावेळी 'इन्किलाब जिंदाबादच्या' घोषणा देत पत्रके फेकली.


यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली व त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला, मार्च २३, १९३१ साली भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या तरुण क्रांतीकारकांना फासावर लटकविण्यात आले. भारताला स्वतंत्र करणे हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. 


परिणामांची पर्वा न करता त्यांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले व हसत-हसत मृत्युला मिठी मारली. देशासाठी जास्त काही करता आले नाही याचेच  त्यांना दुःख होते. हे थोर क्रांतीकारका, आम्हाला आजचे हे भाग्यशाली दिवस दाखविल्याबद्दल शतशः धन्यवाद . मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद