इंटरनेट चे फायदे मराठी निबंध । Essay on Advantages of internet in Marathi.

 इंटरनेट चे फायदे मराठी निबंध । Essay on Advantages of internet in Marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण इंटरनेट चे फायदे मराठी निबंध बघणार आहोत. शास्त्र व तंत्रज्ञान यामुळे माणसाचे जीवन आरामदायक बनले आहे. आपले आयुष्य अधिकाधिक सुखी व संपन्न करण्यासाठी आपल्या गरजांनुसार माणसाने नवनवीन शोध लावले. संगणकाचा शोध हा असाच वेगाने आकडेमोड करु शकणारे यंत्र हवे या मानवाच्या गरजेतून लावला गेला. 


यापुढिल पायरी होती, संगणकांना एकमेकांशी जोडून त्यांच्यात संवाद घडवून आणणे. संगणकांद्वारे माहिती एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर पाठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जाळ्याला इंटरनेट असे म्हणतात. यामुळे जगाच्या काना-कोपऱ्यातील माहिती आपल्या टेबलवर मिळू शकते.


एखाद्या संगणकातील माहिती काही कारणाने नाहीशी झाल्यास तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या शास्त्रज्ञांना एकाच वेळी एकाच प्रकारची माहिती सहजपणे हाताळता यावी या गरजेतून इंटरनेटचा जन्म झाला. सर्वप्रथम अमेरिकन लष्करात याचा वापर केला गेला. 


पुढे हे क्षेत्र झपाट्याने विस्तार पावले. आज आपण इंटरनेट किंवा संगणकाशिवाय जगाचा विचार ही करु शकत नाही. इंटरनेटमुळे व्यवसाय तसेच व्यापार करणे अधिक सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी तर ते एक वरदान आहे. इंटरनेटद्वारे आपण घरबसल्या कोणत्याही विषयाचे शिक्षण घेऊ शकतो. 


याद्वारे कंपनी अतिशय कमी किमतीत असंख्य लोकांपर्यंत आपले उत्पादन नेऊ शकते. यातील रिमोट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व इंटरनेट फोन द्वारे लोक जगभरातील कुठल्याही व्यक्तिशी सहज संपर्क साधू शकतात. आपण आपल्या फाईल्स, बातम्या, डेटा, एवढेच नव्हे तर वैयक्तिक माहितीही जगभरात कुठेही काही सेकंदातच पाठवू शकतो. 


इंटरनेटवर सिनेमा, खाद्यपदार्थ, ताज्या घडामोडी, जोक्स, वधू-वरांची यादी अशा अनेक बाबींबद्दल माहिती मिळते. आपल्या आवडीनुसार माहिती गोळा करुन ती साठवून ठेवता येते. त्याची छपाई करता येते किंवा मित्र मैत्रीणींना पाठवता येते.


रिसर्च व उच्च शिक्षणाकरीताही इंटरनेटचा उपयोग करुन घेता येतो. विद्यार्थी जगभरातील कुठल्याही विद्यापिठातून, लायब्ररीतून माहिती गोळा करु शकतात. ई-मेल, चॅटिंग, ब्लॉग्ज, ऑरकूट हे आजच्या पिढीचे परवलीचे शब्द आहेत. इंटरनेट वरून आपल्या आवडीच्या विषयांवर आपले मत नोंदविणे, समान आवडी असणारे मित्र-मैत्रिणी शोधणे, सल्ला घेणे शक्य होते. 


एखाद्या संवेदनशील विषयावर जनमत जागृत करता येते. नवीन लोकांना भेटणे, जुने मित्र शोधून काढणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हे सर्व इंटरनेट मुळे साध्य होऊ शकते. अशा प्रकारे या मानवी वरदानाचा उपयोग व आवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याचा उपयोग मानवाने आपल्या फायद्यासाठी व सुखशांती साठी करुन घ्यावा. न जाणे कधी या वरदानाचा भस्मासुर होईल ते! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद