माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | Essay On Diwali In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या भारतात सणांना तोटा नाही. अनेक धर्माचे लोक भारतात रहातात व प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी, दसरा, गुढी पाडवा, होळी, नागपंचमी हे हिंदू सण जितक्या मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात तिक्याच उत्साहाने इद, मोहर्रम, नाताळ, पोंगल, महावीर जयंती हे सण ही साजरे केले जातात.
या सर्व सणांत मला मात्र दिवाळी हा सण अतिशय आवडतो. दिवाळी हा आपल्याकडील सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा सण मराठी महिन्यांनुसार कार्तिक महिन्यात येतो. मात्र त्याची तयारी महिनाभर आधीच सुरु होते. मला हा सण आवडण्याचे कारण म्हणजे यावेळी शाळेला सुट्या असतात हे आहे.
तसेच आई घरी निरनिराळे पदार्थ बनविते त्यामुळे चंगळच असते. दिवाळी साजरी करण्यामागे इतरही काही संदर्भ आहेत. रामाने रावणाचा पराभव केल्यानंतर याच काळात तो अयोध्येस परतला होता. त्यामुळे अयोध्येच्या नागरिकांनी त्याच्या स्वागताप्रीत्यर्थ शहरातील सर्व रस्ते व घरे दीप लावून प्रकाशमान केले, तोरणे उभारली.
हीच परंपरा आजही चालू आहे. दिवाळीचा हा सण चार दिवसांचा असतो. त्याआधी घरांची साफसफाई केली जाते. .घरे रंगविली जातात. घरोघरी मिठाई व इतर पक्वान्ने बनविली जातात. प्रत्यक्ष दिवाळीच्या वेळी घरासमोर रांगोळया काढल्या जातात.
घराबाहेर रंगीबेरंगी आकाशदिवे लावले जातात. संध्याकाळी पणत्या लावल्या जातात. अशा तऱ्हेने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. घरे, रस्ते, लहान-मोठी गावे प्रकाशाने उजळून निघतात. सर्वात जास्त मजा येते ती फटाके उडवायला. मोठ्या आवाजाचे फटाके, भुईचक्र, फुलबाज्या उडविण्यातला आनंद काय वर्णावा! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठिकठिकाणी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
संपत्तीची ही देवी आपल्या घरी यावी हीच त्यामागची भावना असते. भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते व त्याच्या सुखाची, भरभराटीची कामना करते. तर पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. अशा प्रकारे चारही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.
म्हणूनच हा उत्साहाचा, भरभराटीचा व मांगल्याचा सण मला अतिशय आवडतो. या काळात शेतातील कामे संपलेली असतात व पीके घरी आलेली असतात. त्यामुळे शेतकरीही आनंदात असतात. सगळीकडे सुखासमाधानाचे व आनंदाचे वातावरण असते . मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद