मला पंख असते तर मराठी निबंध | Jar Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला पंख असते तर मराठी निबंध बघणार आहोत. रविवारी संध्याकाळी मी व आई-बाबा खरेदीसाठी बाहेर पडलो. रविवार असल्याने रस्त्यावर खूपच गर्दी होती. सर्व दिशांनी वाहने धावत होती आणि रस्ता छोटा. थोडे दूर जात नाही तोच आम्ही ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो.
प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई, त्यामुळे गर्दी आणखिनच वाढली. चारही बाजूंनी वाहनांचे, त्यांच्या भोंग्यांचे कर्णकर्कश्श आवाज वाढू लागले. प्रदूषण आणि उशिर यामुळे आम्ही अगदी वैतागलो होतो. मी आईला म्हंटले, 'आपल्याला जर पंख असते तर किती बरे झाले असते, नाही? या ट्रॅफिकमध्ये मी अडकलेच नसते. '
* खरच! देवाने माणसाला मन, बुद्धि, बोलण्याची कला सर्व काही दिले. पंख तेवढे फक्त पक्षांना दिले. पक्षांप्रमाणेच आपल्यालाही पंख दिले असते तर किती गम्मत झाली असती. मला जर पंख मिळाले तर मी उंच आकाशात फिरतच राहीन. अभ्यास करून कंटाळा आला की चालले उडायला.
स्वच्छ, मोकळ्या हवेत चक्कर मारुन आले की परत अभ्यास करायला नक्कीच उत्साह येईल. कितीही लांब जायचे तरी अगदी थोड्या वेळात जाता येईल. मला पंख मिळाले तर मी झाडांवरची ताजी फळे खाईन. अगदी नारळाच्याही झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसेन.
मला कोणत्याही गाडीची गरज पडणार नाही. पेट्रोलचा खर्च किती कमी येईल. शिवाय प्रदूषणही वाढणार नाही. पंख असल्यावर मी अगदी फुकटात जगात फिरुन येईन. जगातील सातही आश्चर्य आणि इतरही निसर्गरम्य ठिकाणे पाहून येईन.
त्यासाठी रेल्वेचे आरक्षण नको की विमानाचे तिकीट नको. उडत उडत अगदी एव्हरेस्टच्या टोकावरही जाऊन येईन. शिवाय असे फिरतांना खाण्या-पिण्यासाठी रस्त्यात मिळणारी ताजी फळे आणि रानमेवा आहेच.
आकाशात उडतांना इंद्रधनुष्यातील रंग अगदी जवळून पहाता येईल. ढगांशी लपंडाव खेळता येईल. चंद्र चांदण्यांसोबत दंगामस्ती करता येईल. सगळी बंधन झुगारुन मी मुक्तपणे संचार करीन. पंख असल्यावर माझा आणखी एक फायदा होईल.
माझ्यावर कोणी रागावले किंवा भांडण करायला आले की पटकन उडून जाता येईल. आईला, शिक्षकांना मला शिक्षा करताच येणार नाही. पण मी आकाशात उडाले तर आकाशात असलेल्या पक्षांना ते आवडेल का? की मला एकटीला पाहून ते माझ्यावर धावून येतील? पण हे सारे केव्हा? मला पंख असते तर. सध्या तरी ही कवीकल्पनाच म्हणायची।