माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध बघणार आहोत. मी एक भारतीय आहे. माझे माझ्या देशाबद्दल अतिशय सुंदर व मनोहर स्वप्न आहे. माझ्या भारतीय असण्याबद्दल मला अभिमान आहे. मला माझ्या देशाला ते पूर्वीचेच प्राचीन वैभव प्राप्त करुन द्यायचे आहे. माझ्या देशाने सर्व जगाला ज्ञान व संस्कृतीचा संदेश द्यावा असे मला वाटते.
माझ्या देशाने आपल्या सर्व शेजारी देशांना मदत करावी व शांतीचा संदेश द्यावा. जगाचे नेतृत्व करावे. माझ्या स्वप्नातील भारत आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण असेल. येथे लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना पूर्ण स्वातंत्र्य असेल व समान सोयी उपलब्ध असतील.
माझ्या स्वप्नातील भारतात निरक्षरता अजिबात नसेल व असे शिक्षण दिले जाईल की प्रत्येकजण स्वत:पुरते कमवू शकेल. कोणीही गरीब, भिकारी किंवा उपाशी रहाणार नाही. प्रत्येकासाठी काम असेल. स्त्रीशिक्षणावर विशेष भर दिला जाईल.
शरीर निरोगी असले तर मन ही निरोगी असते. म्हणूनच देशातील प्रत्येक खेड्यात, गावात चांगली इस्पितळे व सर्व प्रकारच्या वैद्यकिय सोयी उपलब्ध असतील. देशाचे नागरिक निरोगी असतील तर सहाजिकच देशाच्या प्रगतीत ते सहभागी होऊ शकतील.
माझ्या देशातून जातीयता, अस्पृश्यता, जाती-भेद पूर्णपणे हद्दपार झालेले असतील. देशात मैत्रीभाव व सुखशांती नांदेल. स्त्रियांवर अत्याचार होणार नाहीत व त्यांना समान संधी मिळतील. तसेच शिक्षणावर आधारित भेदभाव भारतात नसेल.
भारत हा कृषीप्रधान देश असल्याने बळीराजाला येथे सर्वाधिक महत्त्व दिले जाईल. देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण होऊ शकेल या दृष्टीने शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा व तंत्रज्ञान उपलब्ध असेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपण इतर देशांच्या बरोबरीने उभे रहावे असे मला वाटते.
सध्या देशाला दहशतवादी कारवायांना तोंड द्यावे लागत आहे. माझ्या देशातून युद्ध, लढाया, बाँम्बस्फोट, दहशतवाद पूर्णपणे नाहीसे झालेले असेल. कारण देश सैनिकीदृष्टया मजबूत असेल. आपल्या कडील अणूविज्ञानाचा उपयोग आपण मानवाच्या कल्याणासाठी करु व शांततेचा संदेश सर्व जगाला देऊ.
अशा प्रकारे माझ्या स्वपनातील भारत हा गांधीजींनी दाखवून दिलेल्या सत्य व अहिंसेच्या मार्गावरून चालणारा असेल. तो खऱ्या अर्थाने जगातील महासत्ता असेल व नेहमी न्यायपूर्ण मार्गानेच वाटचाल करेल. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद