सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध । Sainikache Atmavrutta Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. मी नितीन मराठे. मी एक निवृत्त सैनिक आहे. आज देशाच्या सीमेवर दहशतवादी व शत्रुसैन्य अनेक विघातक कृत्ये करतात, आपल्या जवानांचे प्राण घेतात हे ऐकून रक्त सळसळते आणि वाटते बंदूक घेऊन सीमेवर जावे.
वय झाले पण जोश कमी झाला नाही. कारण रणभूमी हीच माझी मायभूमी आहे. मी वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यात दाखल झालो. बारावीनंतर पुढे काय करावे हा प्रश्न होता. घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती. आमच्या गावात एक निवृत्त सुभेदार होते. त्यांनीच देशप्रेमाची ज्योत मनात जागवली.
त्यांच्या पराक्रमांच्या गोष्टी ऐकून सैनिकी, जीवबाची ओढ लागली. एके दिवशी जिल्हयाच्या ठिकाणी सैन्यभरतीची बातमी ऐकली आणि मी त्या कार्यालयात हजर झालो. माझ्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या, वैद्यकीय तपासण्या झाल्या व अखेर सैन्यात दाखल करुन घेण्यात आले.
भरतीनंतर मला प्रशिक्षणासाठी डेहरादून येथे पाठविण्यात आले. प्रशिक्षण अतिशय कठीण होते. सैन्यातील शिस्त अतिशय कडक असते. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मला राजस्थान मध्ये सीमेवर पाठविण्यात आले. येथे दिवसरात्र डोळ्यात तेल घालून सीमारक्षण करावे लागे.
वैराण, रुक्ष वाळवंटात फक्त आमचा सैनिकी तळ होता. आजूबाजूला मैलोंमैल मानवी वस्ती नव्हती, गावाकडून अधून-मधून येणारी पत्रे आणि रेडीयो येवढी दोनच मनोरंजनाची साधने.
अशातच भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले. या युद्धात मी खूप चांगली कामगिरी केली. अनेकदा जीवावर बेतले. बंदूका, बॉम्बस्फोट, त्यांचे कानठळ्या बसविणारे आवाज, रणगाडे यांच्या सोबतीने अनेक रात्री घालवल्या. साथीदारांचे डोळ्यांदेखत मृत्यू पाहिले.
पुढच्या क्षणाला काय होणार हे निश्चित नसे. शत्रूने आमच्यावर अनेकदा जोरदार हल्ले केले. परंतु आम्ही प्रयत्नांची शर्य करुन त्यांना पळवून लावले. या युद्धात आपली जीत झाली. मला माझ्या शौर्याबद्दल बढतीही मिळाली.
नंतरच्या काळातही मी सैन्यात चांगली कामगिरी केली. अनंत आठवणींनी माझे मन भरून येते. सैन्यातील या नौकरीने मला देशसेवेची अमूल्य संधी मिळाली. सैन्याने मला शिस्त, परिश्रम करण्यास शिकविले. येईल त्या परिस्थितीचा धैर्याने सामना करण्यास शिकविले.
म्हणूनच म्हणतो, तरुणांनो सैन्यात भरती व्हा. आपले व देशाचे भविष्य घडवा. आपली शक्ति, बुद्धि देशाच्या सेवेसाठी, सुरक्षेसाठी खर्च करा. हेच प्रत्येक तरुणाचे परमकर्तव्य आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद