श्रमाचे महत्व निबंध मराठी | Shramache Mahatva Nibandh Marathi

 श्रमाचे महत्व निबंध मराठी | Shramache Mahatva Nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  श्रमाचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या समाजात कष्टाची कामे करणाऱ्या श्रमिकांना कमी लेखले जाते. कारण आपण श्रमाचे महत्त्व जाणत नाही. खरे पहाता कष्ट, परिश्रम केल्याशिवाय कोणती गोष्ट मिळते? शेतकरी उन्हातान्हात शेतात राबतो म्हणून आपल्याला धान्य मिळते. 


पाथरवट दगड फोडतो म्हणून आपल्याला घरं बांधता येतात. वीणकर कपडे विणतो म्हणून आपल्याला कपडे मिळतात. अनेक कामगार यंत्रांवर दिवस-रात्र काम करतात म्हणून आपल्याला हर तऱ्हेच्या वस्तू सहज उपलब्ध होतात. मग हा श्रमिक कमी प्रतीचा कसा? 


श्रम म्हणजे कष्ट, जेथे कष्ट केले जाते तेथे यश आपोआप येते. कोणतेही काम मनापासून केले तर भरभराट होते. त्यासाठी गरीब-श्रीमंत असा भेदभाव करणे योग्य नव्हे. प्रत्येकाने लहानपणापासूनच कष्ट करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. 


गांधीजी अवघ्या देशाचे नेतृत्व करीत, परंतु स्वतःचे कपडे धुण्यापासून ते सर्व प्रकारची कामे स्वतःच करीत असत. गांधीजी म्हणत, "सर्व कामे सारखीच महत्त्वाची आहेत व प्रत्येक काम करणारा माणूस हे जग अधिक सुंदर बनवित असतो." आपल्या आश्रमात रहाणाऱ्या लोकांसमवेत गांधीजी ही स्वयंपाकघरातील कामे करीत तसेच आश्रम स्वच्छ ठेवण्यात मदत करीत.


कष्ट करणाऱ्या व्यक्तिस ईश्वर नेहमीच मदत करतो. कष्टाविणा मिळालेले धन किंवा सत्ता खरे सुख देत नाही. संत गाडगेबाबा सांगत, 'आधी काम करा, मगच भाकर घ्या.'


आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. ज्याच्या अंगात आळस असतो तो प्रगती करु शकत नाही. कष्ट केल्याने मानसिक समाधान मिळते. असा पैसा, प्रगती माणसाची झोप उडवित नाही. आपण चांगल्या हेतूने केलेल्या कुठल्याही कामाची लाज का बाळगावी? 


आळसामुळे माणसाचे आरोग्यही नीट रहात नाही. शरीर अनेक आजारांनी पोखरले जाते. थोडक्यात, 'आधी कष्ट, मग फळ' हेच खरे.


नसे राऊळी वा नसे मंदिरी

जिथे राबती हात तेथे हरी।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद