सूर्य संपवर गेला तर निबंध मराठी | Surya Sampavar Gela Tar Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य संपवर गेला तर मराठी निबंध बघणार आहोत. सूर्यवंशी असणारा मी! कधी नाही ते आज लवकर उठलो आणि गॅलरीत गेलो.
'पिवळे तांबूस ऊन कोवळे
पसरे चौफेर !'
आकाशात सप्तरंगाची उधळण करणारा तो लालेलाल सूर्य पाहून मी त्याला मनोमन नमस्कार केला. तेवढ्यात वृत्तपत्र टाकणाऱ्याने टाकलेले वृत्तपत्र माझ्या डोक्यावर पडले. सूर्याने आशीर्वाद दिला असे समजून मी ते हातात घेतले आणि पान उघडले.
XXX प्रकरणी कुणाचा ना कुणाचा संप चालूच राहतो. संपाने देखील संप करायला हवा परंतु तो करीत नाही याचे आश्चर्य वाटले? संप हा लोकशाहीतच जमतो साम्यवादी चीनमध्ये विद्यार्थ्यांना संप केला तेव्हा त्यांच्यावर रणगाडे फिरवले होते. तीन हजार विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. तेवढ्यात माझी नजर सूर्याकडे गेली.....
“उगवला सूर्यनारायण जसा शेंदराचा खापा
फुले अंगणात माझ्या सोनचाफा"
ही कवीची काव्यपंक्ती अत्यंतसार्थ वाटली. तेवढ्यात विचार आला हा औदर्याचा सागर, अविरत कामात असलेला आपल्या सहस्त्ररश्मींनी सर्व जीवसृष्टीला किरणांची आंघोळ घालणारा हा कर्मवीर आपला जीवनदाताच आहे. तो कधीही न थकता संपावर न जाता ..... कार्यरत आहे. आणि तोच संपावर गेला तर.....
काय म्हणून काय विचारता? सारे सृष्टीचक्रच बंद पडेल. असा विचार करताना मात्र माझे विचारचक्र जोमाने सुरू झाले. अरे, खरोखरच किती मजा येईल? दररोज सकाळी उठायची कटकट राहणार नाही. सूर्य नाही म्हणजे शाळा नाही किती मजा!
दिवसभर नुसते खेळायचे पण खेळायचे तरी कुठे? या असल्या गुडूप अंधारात? अहो आणखी एक गोष्ट शाळा नाही म्हणजे शिक्षक बेकार होणार! पण इतर कचेऱ्या तरी कुठं चालू राहणार? साऱ्या जगातील लोक बेकार होतील. सारे उद्योगधंदे ठप्प होतील.
सारी औद्योगिक प्रगती थांबेल या विकासाचा डोलारा कोसळू लागेल. जास्तीत जास्त काळ जीवन जगण्यासाठी जो तो धडपडायला लागेल. बाजारात जाऊन अन्नधान्याची खरेदी करून अधिकाधिक धान्य साठवून ठेवण्याचा प्रयत्न करू लागतील.
धान्य विक्रेते तरी सगळे धान्ये कसे देतील? ते 'आधी पोटोबा मग विठोबा' या न्यायाने स्वतःसाठी ठेऊन जास्तीचे शिल्लक असेल तर अधिक भावाने देतील मग या काळ्याकुठ्ठ अंधारात चोरी, घरफोड्या यांना ऊत येईल! कशासाठी पैशासाठी तर मुळीच नव्हे. अन्नधान्यासाठी, जगण्यासाठी.
सूर्य नाही म्हणजे सूर्यप्रकाश नाही त्यामुळे पर प्रकाशित चंद्र व इतर ग्रह चमकणार नाहीत. मग मात्र कवीची चांगलीच पंचाईत होईल. त्याच्या प्रतिभाशक्तीला खीळ बसेल. पण त्यासाठी ते जिवंत तर असायला हवेत. सूर्यप्रकाश नाही म्हणजे हरित वनस्पतीत प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडणार नाही. अन्नधान्यच निर्माण होणार नाही. त्यामुळे सारे सजीव नष्ट होतील.
हे सारे प्रश्न विचारात घेऊन अगोदरच मानवजात सूर्याला प्रार्थना अशक्यच आहे. कारण सूर्य संपावर काही जाणार नाही. काही शास्त्रज्ञ सांगतात अब्जावधी वर्षांनी सूर्याचा प्रचंड स्फोट होऊन सूर्यमाला नष्ट होईल पण सृष्टीतील सौंदर्य पाहणाऱ्या आमच्यासारख्या कवींना हे कसे पटेल?
“अमर्याद मित्रा तुझी थोरवी" असे म्हणतात ते खरेच आहे. सूर्यमात्र त्याच्या अथक परिश्रमातून लोकांना संदेश देतो की -
“सुताने स्वर्गासी जाणे ।
कासया कार्य केविलवाणे ।
बुद्धीची ही अवलक्षणे ।
श्रमकारी होय ।। "
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद