वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh

 वीज बंद पडली तर मराठी निबंध । vij band padli tar marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज बंद पडली तर  मराठी निबंध बघणार आहोत. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच अतिशय रंगतदार उंबरठ्यावर उभी होती. सचिन अक्षरशः एकेका गोलंदाजाला धुवून काढत होता. तेवढ्यात अचानक वीज गेली 


आणि एम.एस.ई.बी.' च्या कार्यालयात फोनवर फोन खणखणू लागले व झुंबडच्या झुंबडने हजारो लोक यात्रा भरल्यासारखी तेथे गर्दी करू लागले. एम.एस.ई.बी. च्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून वीज पुन्हा पूर्ववत चालू केली. वीज मंडळाचे नेहमीच रंगात बेरंग करण्याचे घोटाळे असतात असे म्हणत लोक तेथून निघून गेले.


या छोट्याशा प्रसंगावरून मी माझ्या मनाशी विचार करू लागलो. थोडाच वेळ वीज नव्हती म्हणून मंडळावर चिडलो, मोर्चा नेला. पण खरोखर संपूर्ण जगातील वीज नेहमीसाठीच बंद पडली तर..... अरे!... अरे!... नुसत्या विचारानेच अंगावर शहारे येतात. काय हाल होतील या जगाचे ? म्हणजेच जगातील माणसाचे. 


यंत्राच्या दरबारात काम करणाऱ्या हजारो कामगारांचे हजारो हात बेकार होतील. बेकारीचा सतावणारा राक्षस मानवाला 'पळता भुई थोडी करील'. वीज बंद म्हणजे त्यावर चालणारा पंखा, कुलर बंद! म्हणजे उन्हाळ्यात उकडलेल्या रताळ्यासारखी आपली स्थिती होणार. 


वीज बंद म्हणजे अतिशीत प्रदेशातील घर गरम करणारे हीटरही बंद! मग काय ? या माणसांना इतर जलचराप्रमाणे जगण्यासाठी जलाशयावर साचणाऱ्या बर्फाखाली दडून बसावे लागेल. अथवा स्थलांतर करणाऱ्या पक्षांप्रमाणे हिवाळ्यात विषुवृत्तीय प्रदेशाकडे व उन्हाळ्यात मायदेशी असा प्रवास करावा लागेल.


वीज बंद म्हणजे मानवी जीवनच बंद नव्हे काय? दूरदर्शन, रेडिओ, टेपरेकॉर्डर, दूरध्वनी, संगणक हे सर्व साधने बंद पडतील. संगणकाने केलेली प्रत्येक क्षेत्रतील प्रचंड कामगिरी अक्षरशः धुळीस मिळेल. आपले मनोरंजन कसे होणार? आणि केवळ मनोरंजनच नव्हे तर मोठ्या दवाखान्यात किती तरी यंत्रे हे विजेवर चालणारी असतात.


अतिदक्षता विभागात मृत्यूच्या दोढेत अडकलेली असंख्य रुग्ण त्यातून बाहेर कशी पडणार? विजेमुळे जी विज्ञानाची प्रगती झाली आहे ते विज्ञानच मुळातून नष्ट होईल! आणि मग आजच्या धावत्या युगात यंत्राच्या जोरावर प्रचंड आघाडीवर असलेला प्रगतमानव आज आणि उद्या करिता कायमचा अंधारात डुंबला जाईल. 


त्याची प्रगतीकडे, विकासाकडे असलेली वाटचाल तिथेच थांबेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आजच्या युगात वीज म्हणजे मानवी जीवनाचा प्राण आहे. प्रत्येक गोष्ट विजेवर अवलंबून आहे. विजेमुळे मानव आज समुद्राच्या तळापर्यंत आणि अवकाशातील अतिशय उंचीवर जाऊन पोहोचला आहे. 


सर्व जग सेकंदात ऐकमेकांच्या संपर्कात येवू लागले आहे आणि हीच वीज बंद पडली तर... मानवी जीवन आत्मा नसलेल्या शरीराप्रमाणे, इंजिन नसलेल्या गाडीप्रमाणे किंवा देव नसलेल्या मंदिराप्रमाणे होईल. विजेवर चालणारी सर्व यंत्रे बंद पडतील. 


यंत्राची चाके जागच्या जागी थांबतील, प्रगतीचा डोलारा कोसळू लागेल, करोडो लोक बेकार होतील, सर्वत्र अंधार पसरेल. मानवी जीवन जनावरापेक्षाही रुक्ष होईल. पोटाची खळगी भरणे आणि जगणे एवढेच त्यांच जगणे असेल. सर्वत्र हाहाकार माजेल, माणसामाणसात संघर्ष होतील आणि माणसेच माणसाला संपवू लागतील. 


माणसाला मग विजेची खरी किंमत कळेल आपण दररोज विजेचा किती अपव्य करत होतो ही चूक समजून येईल. वीज निर्मितीसाठी अथवा बंद पडलेली वीज पूर्ववत चालू करण्यासाठी ते प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि त्या दिवसापासून विजेचे साठे संपू नयेत म्हणून अधिक दक्ष राहतील. 


गरजेप्रमाणे वापर करून विजेचा साठा जास्तीत जास्त राहील व वीज बंद पडणार नाही याची नेहमीच काळजी घेतील. असे मला वाटते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद