औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे मराठी निबंध | audikikarnache fayde and tote essay marathi

औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण औद्योगिकीकरणाचे फायदे व तोटे मराठी निबंध बघणार आहोत.  गुहांमध्ये राहणाऱ्या, प्राण्यांची शिकार करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिमानवाची शारीरिक, मानसिक नि बौद्धिक प्रगती होत गेली. हळूहळू तो समूहाने राहू लागला. 


वसाहती वसवू लागला. शेतीचं तंत्र शिकला. शेतीसाठी उपयुक्त अवजारे बनवू लागला. प्रगतीच्या या टप्प्यांवरच चाकाचा शोध लागला. या शोधाने मानवाला प्रगतीपथावर कितीतरी योजने दूर नेऊन प्रगत करून टाकले. चाकांच्या मोटेने शेतात पाणी खेळू लागले. 


कुंभाराची गाडगी-मडकी कमी वेळात होऊ लागली. प्रवास सुलभ झाला. चाकाच्या गाडीने मालवाहतूक सुलभ झाली. पुढे विजेचा, दातांच्या चाकाचा, गिअरचा, टेलिफोनचा शोध लागला नि विज्ञान युगाचा प्रारंभच झाला. लोक एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने, समूहाने वेगवेगळ्या प्रकारचे काम करू लागले. 


वस्तू उत्पादित करून बाजारात विकू लागले. ह्यातूनच 'उद्योगा'चा जन्म झाला. वैज्ञानिक संशोधनाच्या जोडीला, शिक्षण, पाश्चिमात्यांचे अनुकरण हेही होतेच. उद्योग फोफावू लागला. जमशेदजी टाटा, विक्रम साराभाई, शंतनुराव किर्लोस्कर ह्यासारख्या उद्योजकांनी गेल्या शतकात उद्योगक्षेत्राची भरभक्कम पायाभरणीच केली. 


दुर्दम्य इच्छाशक्ती, संकटांवर मात करण्याची चिकाटी, संयम, सोशिकता, ऊनसावलीचे, चटक्यांचे दिवस सोसण्याची अपार ताकद, उदंड कार्यक्षमता, व्यवहार निपुणता, कृतीशीलता, अभिनव प्रयोगशीलतेतील धारिष्ट्य, दृढनिश्चय, धीरगंभीरता म्हणजेच उद्योगशीलता!


वैयक्तिक जीवनात, समाजात, क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा आत्मविश्वास व आत्मनिर्धारही उद्योजकाच्या ठायी असावा लागतो. ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रिलायन्स कंपनीचे मालक श्री. धीरूभाई अंबानी! सुरुवातीच्या काळात डोक्यावरून नेऊन आपला माल खपवणारे एक उद्योगपती धैर्यशाली, 


तसेच इन्फोसिसचे डॉ. नारायण मूर्ती! शून्यातून अफाट उद्योगविश्व निर्माण करणारे हे कर्मयोगी. कर्मयोग्याच्या पाठीशी ईश्वर असतोच. कामकऱ्यांच्या हातातील कार्यक्षमता वापरून त्यांनी उद्योगाची सर्वार्थाने प्रगती साधली. देशाच्या औद्योगिक विकासात ह्या प्रभृतींचा फार मोठा मोलाचा वाटा आहे, तर प्रवीण मसाले', 'के', 'लिज्जत' पापडवाल्यांचा खारीचा!


उद्यम: साहसं धैर्यं बुद्धि शक्ती: पराक्रमः पडेते यत्र वर्तन्ते तत्र देव: सहायकृत अशा आदर्श व्यक्तींची चरित्रेही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. उद्योगाच्या मागे लक्ष्मी आपसूकच येते. म्हणूनच आळसाची मैत्री सोडून, कामधंद्यांची सुरुवात लवकरात लवकर करणे हितावह आहे. 


'उद्योगासाठी झटणे हा शहाणपणा आहे. दारिद्र्य नष्ट होण्यासाठी उद्योगशील व्हा.' हा मोलाचा संदेश शंभर वर्षांपूर्वीच लोकहितवादींनी भारताला दिला. उद्योग हा एकदम मोठा होऊन जन्माला येतच नाही. तो प्रथम लहानसहानच असतो. 


पण साध्या पन्नास पैशाच्या गारेगार पेप्सी करण्यापासून कोट्यवधी रुपयांची आइसफॅक्टरी निर्माण होऊ शकते. यांत्रिकीकरणाने तर ह्या उद्योगधंद्यामध्ये जादुई चमत्कार आणलेत. औषधांच्या बाटल्या, गोळ्या, दुधाच्या पिशव्या यंत्राने भरल्या जातात. 


माणसांची छायाचित्रे, कागदपत्रांचे झेरॉक्स काही क्षणातच मशीन काढून देते. अहो आश्चर्यम्! गाईच्या मोठ्या गोठ्यातील पाच/ पाच हजार गाई-म्हशींचे दूध मशीनने काढले जाते. कडबाकुट्टी यंत्रावर गुरांचा कडबा बारीक कापला जाऊन अलगद त्यांच्या पुढ्यात गव्हाणीत येऊन पडतो. 


यंत्रानेच दूध डेअरीतील दुधाचे संकलन, साठवण, शीतकरण, दुग्धजन्य उत्पादितांची चक्का, लोणी, दूध पावडर, लस्सीची निर्मिती व पॅकिंगही यंत्राद्वारेच केली जातात. खाद्यपदार्थांच्या आच्छादनांवर रुबाबात लिहिलंही जातं. 'Untouched by human being.'


हॉटेल चालवणे हा तर सर्वांत तेजीमधला उद्योग. धावपळीच्या व दगदगीच्या जीवनात उभ्या उभ्या, पटकन खाऊन पुढच्या कामाला पळणाऱ्या माणसांना एक दिलासाच! पण हे सारे करताना, खाताना-पिताना मनात कधीतरी येऊन जातं. ही untouched प्रॉडक्टसच आपल्याला गहिऱ्या माणुसकीच्या स्पर्शापासून लांब नेत आहेत की काय! पूर्वी अगदी छोट्या गावातलं दूध संकलित करून शहरात पाठवायला किती द्राविडी प्राणायाम पडत असे पण एकीकडे गावातल्या माणसांना



रोजगारही मिळत होता. या यंत्रांमुळे बेकारीची समस्या वाढते आहे. उद्योगांमध्ये शेती ही कुठे मागे नाही. दुसऱ्या 'हरितक्रांती' ची स्वप्ने शेतकऱ्यांना पडू लागली आहेत. हेक्टरी विक्रमी उत्पादन काढण्याच्या शोधात हे 'निर्मिक' नवनव्या संकरीत जातीचे बी-बियाणे निर्माण करीत आहेत. 


दृष्ट लागेल अशा देखण्या भरघोस पिकांसाठी पारंपारिकत्वाला कधी ओझरता, तर कधी मोठा छेद देऊन मातीवर अभिनव प्रयोग करीत आहेत. रासायनिक खतांचा भयावह वापर करीत आहेत. पिकं अंत:प्रवाही कीटकनाशकांमळे विषारीही होत आहेत. लगोलग व नगदी पिकांच्या उत्पादनांकरता जमिनी भिजट करीत आहेत, खारवत आहेत. 


भू-प्रदूषणाला हातभार लावत आहोत. तरीही उद्योगाचे घरी लक्ष्मी देवता वास करी' हे आपण गर्वाने म्हणतो. विंदा करंदीकरांसारखा भावूक कवीही उद्योगांनाच प्रोत्साहन देताना म्हणतो, 'पवित्र मजला यंत्राची धडधड समाज हृदयातील हे ठोके... पवित्र मजला सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके.' हे सारं करताना, उद्योगीकरणाच्या तोट्यांनाही सामोरं जावं लागतं. Give and take ह्या उक्तीप्रमाणे फायद्यामागे तोटा आलाच.


म्हणूनच वाटतं उद्योगीकरणाच्या पुढे मागे येणाऱ्या प्रदूषण, पेयजल अभाव, निकृष्ट जमिनींची पैदास, सामाजिक व मानसिक यांत्रिकीकरण ह्यांकडे माणसाने सजगतेने, डोळसपणे लक्ष देणं आद्यकर्तव्य आहे. कारखान्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी, जैविक घटकांचा जमिनीतील हास ह्यांवर तत्काळ उपाययोजना करणं परम कर्तव्यच आणि माणसा-माणसांतला... माणुसकीचा गहिवर जपणं अत्यावश्यक; 


मग... उद्योगशीलतेच्या वारूवर आरुढ होऊन मानसिक सामाजिक व वातावरणीय प्रदूषणाला थारा न देता देशाला वैभवशाली बनवू. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः । मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद